नवी दिल्ली दि ६- लडाखमध्ये चिनी सैन्याच्या चुकीच्या हालचालींना भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) स्थितीत कोणताही बदल होऊ देणार नाही, असा इशारा सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांनी दिला.
शुक्रवारी वेबिनारमध्ये बोलताना रावत म्हणाले, की लडाखमधील भारत-चीन सीमेवर तणाव आहे. बालाकोटमधील सर्जिकल स्ट्राईक हा पाकिस्तानला एक कडक संदेश होता. दहशतवाद्यांना भारतात पाठवले गेले, तर ते वाचू शकणार नाहीत. दहशतवादाशी सामना करण्याच्या भारताच्या नव्या मार्गाने पाकिस्तानची चिंता वाढली आहे. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये प्रॉक्सी युद्ध सुरू केले आहे. चीनशी युद्धाची शक्यता कमी आहे; परंतु सीमेवरील अनावश्यक कारवाईमुळे झालेल्या मोठ्या संघर्षाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. रावत यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने प्रॉक्सी युद्ध सुरू केले आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. सीमा विवाद सोडविण्यासाठी भारत-चीन कोर्प्स कमांडर यांच्यात आज पूर्व लडाखच्या चुशुल भागात चर्चेची फेरी आयोजित करण्यात आले आहे.
पूर्वीच्या बैठकींमध्ये तणाव कमी करण्यासाठी आणि एलएसीची स्थिती बदलू नये, यावर सहमती दर्शविली होती; परंतु चीन वारंवार अटी तोडत होता. भारत आणि चीन यांच्यात एप्रिल महिन्यापासून लडाखमध्ये सतत वाद होत आहेत. 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक ठार झाले. चीनमधील 40 हून अधिक सैनिकही ठार झाले. या घटनेनंतर तणाव वाढला. हा वाद मिटविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सैन्य आणि राजनयिक पातळीवरील बैठका झाल्या; परंतु चीन वारंवार आपल्या भूमिकेपासून मागे हटला. २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने लडाखमधील टेकडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; परंतु भारतीयसैन्याने हा प्रयत्न उधळून लावला. यानंतरही चीन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत राहिला; परंतु प्रत्येक वेळी भारतीय सैनिकांसमोर त्याला माघार घ्यावी लागली, असे त्यांनी सांगितली.