नवी दिल्ली/दि.१५ – जवळपास 20 दिवसांनंतर शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. 41 हजारांकडे वाटचाल करत असलेला सेन्सेक्स धाडकन खाली कोसळला. जवळपास एक हजार अंकांनी घसरत सेन्सेक्स 39 हजार 700 च्या स्तरावर बंद झाला, तर निफ्टीदेखील कोसळला असून तीनशे अंकांच्या घसरणीसह 11 हजार 660 च्या स्तरावर आला आहे.
सेन्सेक्समध्ये आज एक हजार 66 अंकांची घसरण झाली. त्यामुळे आज सेन्सेक्स 39 हजार 728 वर बंद झाला. निफ्टी 290 अंकांच्या घटीमुळे 11 हजार 680 वर बंद झाला. गुंतवणूकदारांचे तीन लाख तीस हजार कोटी रुपये बुडाले आहेत. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप घटून 157.22 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. सेन्सेक्सवर एकमेव कंपनी एशियन पेंट्सचे शेअर ग्रीन झोनवर बंद झाले. सर्वाधिक नुकसान बजाज फायनान्शिअल सर्व्हिसेस, टेक महिंद्रा आणि इंडसइंड बँकेचे शेअर आहेत. या शेअरमध्ये चार टक्के आणि त्यापेक्षा जास्त घसरण नोंदविली गेली.
अमेरिका लवकरच दुसऱ्या दिलासा पॅकेजची घोषणा करेल; मात्र या शक्यतांवर पाणी फेरले आहे. यामुळे बाजारात नकारात्मक संदेश गेला आहे. याशिवाय अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरू होते. ‘अमेरिकी डिपार्टमेंट ऑफ स्टेट’ने एक प्रस्ताव दिला आहे. यामध्ये अलीबाबाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची सूचना केली आहे. अलीबाबा सध्या आयपीओ आणण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या तीन आठवड्यांत शेअर बाजारात वाढ होत होती. 29 सप्टेंबर सोडल्यास 25 सप्टेंबरपासून सेन्सेक्स सलग वाढीनंतर बंद होत आहे. 24 सप्टेंबरला सेन्सेक्स 36 हजार 553 च्या स्तरावर बंद झाला होता. 14 ऑक्टोबरला हा सेन्सेक्स ४० हजार 794 च्या स्तरावर बंद झाला होता. गेल्या तीन आठवड्यांत यामध्ये चार हजार दोनशेहून अधिक अंकांची वाढ झाली होती.
…………………….