मराठी

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढणा-यांना धमक्या

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचे चार मुहूर्त

प्रतिनिधि/दी.4
कोल्हापूर: अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढून देणारे बेळगाव येथील पंडित विजयेंद्र शर्मा यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना धमक्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. धमकीची दखल घेऊन टिळकवाडी पोलिसांनी त्यांना पोलिस बंदोबस्त दिला आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचे चार मुहूर्त पंडित शर्मा यांनी काढून दिले होते. राम मंदिराचे भूमिपूजन उद्या होणार आहे; पण मुहूर्त काढून दिलेले पंडित विजयेंद्र शर्मा यांना आता धमक्यांचे फोन येत आहेत. राघवेंद्र नववृंदावनचे प्रमुख असलेले पंडित शर्मा यांच्या मठाजवळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून हे फोन आले आहेत.
अयोध्येतील राम मंदिराचे ट्रस्टी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी शर्मा यांच्याशी संपर्क साधून राममंदिर भूमिपूजनासाठी मुहूर्त काढून देण्यास सांगितले होते. त्यानुसार शर्मा यांनी त्यांना चार मुहूर्त पाठवले होते. २९ जुलै सकाळी नऊ नंतर, ३१ जुलै सकाळी सात ते नऊ दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा नंतर आणि ५ ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस असे ते चार मुहूर्त होते. त्यापैकी पाच ऑगस्टचा मुहूर्त राम मंदिर भूमिपूजनासाठी निश्चित करण्यात आला आहे. १५ जून रोजी हे चार मुहूर्त स्वतः पत्र लिहून शर्मा यांनी स्वामी गोविंद देवगिरी महाराज उर्फ किशोरजी व्यास यांना कळवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button