अमरावती/प्रतिनिधी :- घरात कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात आरोपींनी मागच्या दाराने प्रवेश करून आलमारी मधील साडे तीन तोळे सोने लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली.मालती नितीन सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप चोरट्यांचा कोणताही सुगावा लागला नाही.
घटनेबाबत सविस्तर हकीकत अशी की, मालती नितीन सरोदे व त्यांचे कुटुंबीय २७ ऑगस्ट रोजी परतवाडा येथे आईकडे कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सरोदे कुटुंब घरी परतले असता त्यांना मागील बाजूचे दार उघडे दिसले. त्यांच्या मनात शंकेची पाल चूकचुकताच त्यांनी तातडीने घरातील आलमारी उघडली तेव्हा आलमारी तोडून त्यातील दहा ग्रॅम चा गोफ, वीस ग्रॅम चे मिनी मंगळसूत्र आणि पाच ग्राम ची अंगठी असे एक लक्ष रुपये किमतीचे साडे तीन तोळे सोने चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मालती सरोदे यांनी तातडीने कोतवाली पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४५४,४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेच्या तीन दिवसानंतर सुद्धा कोणताच सुगावा लागला नसून घटनेमुळे परिसरात मात्र चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.