मराठी

टिकटॉक पुन्हा भारतात?

रिलायन्सला कंपनी विकण्याची तयारी

मुंबई/दि.१३– यूजर्सच्या तुलनेत दुसरी मोठी बाजारपेठ राहिलेल्या भारतात परत येण्याची टिकटॉकला घाई झाली आहे. टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाइटडान्स तिचा भारतातील व्यवसाय विकण्याची योजना आखत आहे. बाइटडान्स शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉकचा भारतीय व्यवसाय मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल)ला विकू शकते. या संबंधात दोन्ही कंपन्यांमध्ये जुलैच्या अखेरीस चर्चा सुरू झाली होती; परंतु अद्याप या दोन्ही कंपन्या कोणत्याही करारापर्यंत पोहचल्या नाहीत. यावर रिलायन्स, बाइटडान्स आणि टिकटॉकने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

अमेरिकेत बंदी आल्यानंतर बाइटडान्सने आपला तेथील हिस्सा मायक्रोसॉफ्टला विकण्याचा निर्णय घेतला. बंदीपेक्षा स्थानिक भागीदारांना हिस्सा विकून आपला व्यवसाय तसाच सुरू ठेवण्याचा बाइटडान्सचा प्रयत्न आहे. लडाखमधील गलवान खो-यात चीनने केलेल्या आगळिकीनंतर भारताने चिनी कंपन्यांच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, वीचॅट, अलिबाब ग्रुपचे यूसी ब्राउजर आणि यूसी न्यूज सारख्या लोकप्रिय अ‍ॅपचा समावेश होता. यानंतर सरकारने मागील महिन्यात जुलैमध्ये चीनच्या ४७ अ‍ॅपवर बंदी घातली होती. यापैकी बहुतांश अगोदर बंदी घातलेल्या अ‍ॅपचे क्लोन होते. याप्रकारे भारताने आतापर्यंत चीनच्या १०६ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. टिकटॉकच्या भारतातील व्यवसायाचे मूल्य जवळपास तीस लाख डॉलर्स इतके आहे. भारतापाठोपाठ अमेरिकेतही टिकटॉक बंद होणार आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय खरेदी करण्यासाठी सर्वांत आधी मायक्रोसॉफ्ट कंपनी समोर आली होती. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी ट्रम्प यांना याची माहिती दिली होती. ट्रम्प यांनीदेखील या ऑफरचे समर्थन केले आहे. मायक्रोसॉफ्ट आणि बाइटडन्स यांच्यात टिकटॉकचा अमेरिकन व्यवसाय विकायचा कोणताही अंतिम करार झालेला नाही. टिकटॉकचा अमेरिकन व्यवसाय खरेदी करण्यासाठी ट्विटर बाइटडन्सशीही चर्चे करत आहे. टिकटॉक यूएस व्यवसायाचे मूल्य जवळपास ३० अब्ज डॉलर आहे.

भारतातला व्यवसाय कमी

२०१९ मध्ये बाईटडन्सने भारतात ४३.७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. कंपनीला ३.४ कोटी रुपयांचा नफा झाला. अमेरिकेतून कंपनीला ६५० कोटींचे उत्पन्न मिळाले होते, तर चीनकडून कंपनीला २५०० कोटींचे उत्पन्न मिळाले होते. व्यवसाय उत्पन्नाच्या बाबतीत बाइटडन्सच्या पहिल्या १० देशांमध्ये भारत नाही. २९ एप्रिलच्या डेटानुसार, जगभरात टिकटॉक २०० कोटी वेळा डाउनलोड केले गेले. जगभरात टिकटॉकचे ८० कोटी अ‍ॅक्टीव्ह यूजर्स आहेत.

Related Articles

Back to top button