वॉशिंग्टन/दि.१९ – अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस भारतीय वेळेनुसार 20 जानेवारीच्या रात्री 10.30 वाजता शपथ घेतील. त्याआधी सायंकाळी साडेसहा वाजता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निरोप घेतील. त्यानंतर त्यांच्या मागील समस्यांचे चक्रही सुरू होईल. संसद भवनावरील हल्ल्यासाठी समर्थकांना चिथावणी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या समस्या कमी होताना दिसत नाहीत. रिपब्लिकन पक्षातील मातब्बर सहकार्यांनी ट्रम्प यांची साथ सोडली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाभियोगाची कारवाई सुलभ झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्यांच्यावर बंदी घातली आहे. ते अद्याप अध्यक्ष आहेत; मात्र त्यांची शक्ती गळून गेली आहे. इतिहासकार, कायदा आणि आर्थिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यामागे समस्यांचे चक्र सुरू झाले आहे. पद सोडताच ते घेरले जातील. यासंबंधी डग्लस ब्रिंकले म्हणाले की, शिकागो आणि न्यूयॉर्कमधील राहत्या इमारतीवरील त्यांचे नाव निघाल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण त्यांचे नाव हेट स्पीचप्रमाणे पाहिले जाईल.
उद्योग जगतही ट्रम्पपासून दूर होत आहे. ट्रम्प यांच्या उद्योग साम्राज्यासमोर भांडवलाची समस्या उभी राहू शकते. ड्यूश बँक ट्रम्पच्या कंपनीला दोन दशकांपासून लाखो डॉलरचे कर्ज देत आली आहे. मात्र बँकेने गेल्या आठवड्यात सर्व संबंध तोडले आहेत.ट्रम्प यांच्यावर बँकेचे अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. 1990 मध्ये ट्रम्प दिवाळखोर झाल्यानंतर ड्यूश बँकेनेच त्यांना कर्ज दिले होते. कोका कोला, वॉलमार्ट, मेरियट हॉटेल, जनरल मोटर्स आणि दूरसंचार कंपनी एटीअँडटीने ट्रम्प व त्यांच्या पक्षाला निधी देणार नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, जेपी मॉर्गन चेज, सिटीग्रुप, मॉर्गन स्टेनली, गोल्डमन सेशेसारख्या मोठ्या बँकांनी सांगितले की, त्या ट्रम्प यांच्या प्रचारासाठी दान देणे बंद करतील. ट्रम्प यांच्या फ्लोरिडा गोल्फ कोर्सला आर्थिक मदत दिलेल्या सिग्नेचर बँकेनेही ट्रम्पची दोन खासगी खाती बंद करत असल्याचे म्हटले आहे. अलीकडील काळात ट्रम्प एकमेव अध्यक्ष असतील, ज्यांच्यावर रिपब्लिकन पक्षाच्या आजीवन अब्जाधीश दानशूरांना दूर केल्याचा आरोप आहे. अमेरिकी फर्म होम डेपोचे संस्थापक आणि पक्षाचे अब्जाधीश दाते केन लँगून म्हणाले की, ट्रम्प यांनी त्यांचा विश्वासघात केला आहे.यूएस प्रोफेशनल गोल्फर्स असोसिएशननेही (पीजीए) सांगितले की, ते ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ व्यवसाय करणार नाहीत. संघटना मे 2022 मध्ये न्यू जर्सीच्या गोल्फ क्लबमध्ये चॅम्पियनशिप करणार नाही. ट्रम्प आपल्या गोल्फ कोर्समध्ये ही स्पर्धा करण्यासाठी दीर्घकाळापासून लॉबिंग करत होते. ट्रम्पचे गोल्फ कोर्स त्यांच्या व्यवसायाचा मोठा हिस्सा आहे आणि ट्रम्प ऑर्गनायझेशनचा एकूण महसूल यातूनच येतो. न्यूयॉर्कचे महापौर डे ब्लासियो यांनी गेल्याच आठवड्यात ट्रम्प ऑर्गनायझेशनसोबत काही वर्षांपासून सुरू असणारा व्यवसाय बंद करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, संसदेवरील हल्ल्याच्या एक दिवस आधी 170 दिग्गज बिझनेस लीडर्स आणि सीईओंनी ट्रम्प यांच्याशी संबंध तोडण्याची सुरुवात केली होती.
व्हाइट हाऊस सोडताच ट्रम्प यांना अध्यक्षाच्या रूपात मिळणारे कायदेशीर कवच कुचकामी होईल. त्यांच्यावर 21 जानेवारीपासून न्यायालयात गुन्हेगारी खटला चालू शकतो. एवढेच नव्हे, तर ट्रम्प यांना केंद्रीय व राज्य दोन्ही पातळीवर फौजदारी व दिवाणी आरोपांचा सामना करावा लागेल. सध्याच्या चौकशांमुळे ते एवढे घाबरले आहेत, की स्वत: व मुलांना माफ करण्याचा विचार करत आहेत. वित्तीय फसवणूक व गुन्हेगारी कृत्याची कमीत कमी डझनभर प्रकरणे त्यांची वाट पाहत आहेत. अध्यक्ष कार्यकाळ व 2016 च्या आधीची करचोरीचीही चौकशीही लवकरच सुरू होऊ शकते.