मुदतीआधीच ट्रम्प यांचा कार्याकाळ संपुष्टात !
वाॅशिंग्टन/दि. १२ – अमेरिकेत २० जानेवारी रोजी अध्यक्ष इलेक्ट ज्यो बायडेन हे शपथ घेतील. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प आठ दिवस अजून अध्यक्ष असतील; मात्र अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी रात्री आपल्या संकेतस्थळावर ट्रम्प यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याचे सांगितले. ही पोस्ट लवकरच डिलिट करण्यात आली.
विशेष बाब म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाने (अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने) अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. ट्रम्प यांचे प्रचार पथक किंवा व्हाईट हाऊससुद्धा या प्रकरणावर मौन बाळगून आहे. अमेरिकन वेबसाइट डेलीबेस्टच्या म्हणण्यानुसार, परराष्ट्र विभागाने सोमवारी रात्री ७.४९ वाजता आपल्या संकेतस्थळावर एक संदेश पोस्ट केला. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे, की ट्रम्प यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. काही लोकांनी वेबसाइटच्या या पृष्ठाचा स्क्रीनशॉटदेखील घेतला. व्हाइट हाऊस किंवा ट्रम्प यांचे प्रेस सचिव या विषयावर कोणी काहीही बोलले नाही. हा संदेश वेबसाइटवर कसा उमटला किंवा यासाठी जबाबदार कोण आहे हे समजू शकले नाही. ही तांत्रिक बिघाड होता की वेबसाइट हॅक झाली हे देखील माहिती नाही.
ट्विटरने ट्रम्प समर्थकांची सुमारे सत्तर हजार निलंबित केली आहेत. बुधवारी झालेल्या हिंसाचारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. खुद्द ट्रम्प यांचे वैयक्तिक खातेही निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या निवेदनात ट्विटरने म्हटले आहे, की वॉशिंग्टन डीसीमधील आम्ही हजारो खाती कायमची बंद करत आहोत. या खात्यावर असा मजकूर आहे, जो हिंसा आणि चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहित करतो.