कोरोना रुग्णांसाठी टीव्ही, गेम, पौष्टिक खाद्य एक हजार बेडस्चे सेंटर
टोपे यांच्या हस्ते उद्घाटन
नगर/दि.१७ – आमदार नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने पारनेर तालुक्यातील कर्जुलेहर्यामध्ये एक हजार बेडस्चे सुसज्ज कोव्हिड सेंटर उभे केले आहे. त्यात कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता आणि जेवणासोबतच करमणुकीच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये खास रुग्णांसाठी प्रोजेक्टर, मोबाईल गेम आणि कॅरम बोर्ड अशा अनेक गोष्टींची व्यवस्था Covid करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी टोपे म्हणाले, की या कोव्हिड सेंटरमध्ये अतिशय उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. येथे अनेक बारकावे विचारात घेण्यात आले आहेत. येथील वातावरण पाहून बाधितांना अजिबात भीती वाटणार नाही. शरद पवार यांच्या विचाराला पोषक असे हे काम आहे. येथे रुग्णांच्या करमणुकीचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.‘ कोव्हिड सेंटरमधील सुविधांचं टोपे यांनी भरपूर कौतुक केलं. आ. लंके म्हणाले, या सेंटरमध्ये सकाळी उठल्यानंतर प्रत्येक रुग्णाला अंडे, दूध देण्यात येणार आहे. तसेच दुपारी आणि सायंकाळी जेवण असणार आहे.
योगा शिबिरसुद्धा घेतले जाणार आहे. दररोज सायंकाळी कोरोना बाधितांसाठी भजन, भारुड असे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाईल. हे कार्यक्रम घेताना सामाजिक अंतर भान नियमांचे पालन केले जाणार आहे. येथे प्रत्येक रुममध्ये प्रोजेक्टर बसवण्यात आले आहेत. बाधितांच्या करमणुकीसाठी मोबाईल गेम, कॅरम बोर्ड ठेवले आहेत. एकंदरीत बधितांना आनंदी ठेवण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील या कार्यक्रमाला दूरचित्रसंवादातून उपस्थित होत्या.