नवी दिल्ली/दि. २३ – येत्या एक हजार दिवसांत देशातील सुमारे ४.५ लाख गावांचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या गावांत तरुणांपासून ते स्त्रियांपर्यंत नवीन रोजगाराच्या संधी उदयास येतील. त्यांना शहरात सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. या गावांचे डिजिटलायझेशन केल्याने हे शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांनी १५ ऑगस्ट रोजी उर्वरित सर्व गावात ऑप्टिकल फायबर केबलिंगचे काम पुढील एक हजार दिवसांत पूर्ण करण्याचे जाहीर केले होते. सध्या देशातील सुमारे दीड लाख खेड्यांमध्ये ऑप्टिकल फायबर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित साडेचार लाख गावांमध्ये हे काम तीन वर्षांत पूर्ण होईल. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारे कॉमन सव्र्हिस सेंटर (Common Service Center) चे सीईओ दिनेश त्यागी म्हणाले, की या गावांत ऑप्टिकल फायबरचे आगमन झाल्यानंतर प्रत्येक गावात एक सामान्य सेवा केंद्र उघडले जाईल. केंद्र सुरू केल्याने कमीतकमी पाच लोकांना रोजगार मिळू शकेल. त्यानुसार किमान २० लाख लोकांना थेट रोजगार मिळेल. सीएससी सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांना शिक्षणापासून उपचारांपर्यंत अनेक सुविधा मिळतील आणि त्यांना प्रत्येक कामासाठी शहरात जावे लागणार नाही. प्रत्येक खेड्यात एक गाव पातळीवरील उद्योजका (V.L.E.) ची नेमणूक केली जाईल. बँकिंग सुविधा खेड्यांमध्येच उपलब्ध होईल. ऑप्टिकल फायबरच्या आगमनाने तेथे इंटरनेटचा वेग वाढविला जाईल आणि डेस्कटॉप चालवणे सोपे होईल. ई-कॉमर्सद्वारे(E-commerce) गावकरी आपली उत्पादने विकू शकतील. खेड्यांमध्ये तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी सरकार त्यांना ई-मार्केटमध्ये सामील करू शकते; परंतु हे सर्व केवळ तेव्हाच शक्य आहे, जेव्हा इंटरनेटचा वेग जास्त असेल. ऑप्टिकल फायबरद्वारे इंटरनेटचा वेग वाढणे शक्य आहे, असे त्यागी यांनी सांगितले. भारतनेट कार्यक्रमांतर्गत सर्व गावे जोडली जातील
स्वावलंबनात इंटरनेट महत्वाचे
दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार भारतनेट कार्यक्रमांतर्गत सर्व गावे ऑप्टिकल फायबरने जोडण्याचे काम सुरू आहे; परंतु आता पंतप्रधानांनी स्वत: एक हजार दिवसांचे लक्ष्य ठेवले आहे, त्यामुळे निश्चितपणे हे काम निश्चित वेळेत पूर्ण होईल. तज्ज्ञांच्या मते, देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी, देशातील प्रत्येक खेड्यात केबलद्वारे इंटरनेटची सुविधा असणे आवश्यक आहे.