नागपूर/प्रतिनिधि/दी.६ : शहरात कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचे प्रमाण वाढते असल्याने वैद्यकीय वर्तुळ व प्रशासनासमोरचे आव्हान वाढत आहे. यातच शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. कोरोनामळे दोन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी भगवान शेजुळ व सिद्धार्थ सहारे यांचे निधन झाले. मिळाल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक शेजुळ हे मुख्यालयात कार्यरत होते. ते 26 जुलै पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे कर्तव्यावर गेले नव्हते. 31 जुलैला त्यांनी मुख्यालयाच्या वरिष्ठांना फोन वरून माहिती देऊन आपल्या गैरहजेरीचे कारण सांगितले. दरम्यान, 4 ऑगस्टला त्यांच्यावर योग्य उपचार होत नसल्याची बातमी पुढे आली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी 5.40 च्या सुमारास शेजुळ यांचा मृत्यू झाला. प्रतापनगरातील एका खासगी इस्पितळात दाखल असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ हरिभाऊ सहारे यांचा मृत्यू झाला. सहारे धंतोली पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
५० पोलिसांना कोरानाची बाधा
नागपूर शहर पोलिस दलात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त कोरोना बाधित पोलिसांची नोंद झाली आहे. पण मृत्यू झाल्याची आणि एकाच दिवशी दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याने अवघ्या पोलिस दलामध्ये धडकी भरली आहे.