मराठी

भारत-चीनच्या सैनिकांत गोळीबाराच्या दोनशे फैरी

नवी दिल्ली/दि. १६ – भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा केल्या जात आहेत. मॉस्कोत भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेआधी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, दहा सप्टेंबर रोजी मॉस्कोत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयंशकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या भेटीआधी दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना अत्यंत तीव्र आणि मोठी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या अगोदर दोन्ही देश आपण गोळीबार केल्याचे नाकारत होते.
पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हा गोळीबार करण्यात आला होता. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पँगाँग सरोवराच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 100 ते 200 गोळ्यांचे राऊंड फायरिंग करण्यात आले. तसेच ही फायरिंग एकमेकांवर न करता हवेत करण्यात आली असल्याचीही माहिती मिळते आहे. चीनचे जवळपास 50 हजार सैनिक पूर्व लडाखजवळ असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात आहेत. भारतानेही मिरर-डिप्लोयमेंट करत, चीनच्या बरोबरीने सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात केले आहे. दरम्यान, दोन देशांमध्ये पार पडलेल्या ब्रिगेडियर स्तराच्या बैठकीत काहीही तोडगा न निघाल्यामुळे येत्या काही दिवसांत कोअर कमांडर स्तराची बैठक बोलावण्यात येणार आहे.
भारत-चीन सीमा वाद हा गंभीर प्रश्न आहे. दोन्ही देश शांततेत हा प्रश्न मिटवण्यावर सहमत आहेत. केवळ शांततापूर्ण संवादच या वादाचे निराकरण करेल. चीनने अनेक वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला; मात्र आपल्या सैनिकांनी त्यांना यात सफल होऊ दिले नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. ते लोकसभेत बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला जाऊन आपल्या सैनिकांची भेट घेतली. आपण सैनिकांच्या सोबत उभे आहोत हा संदेश यातून सर्वांना दिला. मीसुद्धा लडाखला गेलो आणि सैनिकांना प्रोत्साहन दिले.

चीनकडून ३८ हजार चाैरस किलोमीटरचा कब्जा

चीनने लडाखमधील सुमारे 38 हजार चौरस किलोमीटर जागेवर अनधिकृत कब्जा केला आहे, याची सर्वांना माहिती आहे. तसेच 1963 मध्ये तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर पाच हजार 180 चौरस किलोमीटरची जमीन बेकायदेशीरपणे चीनला दिली, असे राजनाथ सिंह म्हणाले.

सीमारेषेचा आदर करावा

देशाचे सुरक्षा दल कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात 15 जून रोजी चीनच्या सैनिकांनी स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हा प्रयत्न आपल्या सैनिकांनी उधळून लावला. यामध्ये आपले अनेक सैनिक हुतात्मा झाले. त्याचवेळी चीनचेही मोठे नुकसान झाले. दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर केला पाहिजे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

Back to top button