मराठी

सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

श्रीनगर/दि. १२ – जम्मू-काश्मीरची राजधानी असलेले श्रीनगर आज दोन चकमकींनी हादरून गेले. शहरातल्या रामबाग भागात सुरक्षादलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. हे दोघेही लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचे टॉप कमांडर होते. त्यामुळे सुरक्षा दलांचे हे मोठे यश मानले जात आहे. सैफुल्ला दनयाली आणि इर्शाद अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. सैफुल्ला हा पाकिस्तानचा नागरिक असून इर्शाद हा पुलवामा येथे राहणारा होता. रामबाग भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने या भागात सर्च ऑपरेशन सुरू केले. त्याच दरम्यान संशय असलेल्या घरामधून गोळीबार सुरू झाला. सुरक्षा दलांनी या घराला घेराव घालून त्याला प्रत्युत्तर दिले. दहशतवादी आणि सुरक्षा दलांची ही चकमक काही तास सुरू होती. त्यात हे दोन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांचा गोळीबार एवढा प्रचंड होता, की यात दोनपेक्षा जास्त दहशतवादी असल्याचा संशय आहे. त्यामुळे या भागातील सर्च आपरेशन पुन्हा एकदा सुरू केले आहे.

Back to top button