मुंबई/दि.२६ – देशात अनलॉकची व्याप्ती जसजशी वाढत आहे, तशी अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होऊ लागली आहे. सध्या कृषी, वीज वापर, ट्रॅक्टरची विक्री आणि जीएसटी संकलनातील वाढ यासारखी काही क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगली कामगिरी होत आहे. क्रिसिल इंडिया आणि केअर रेटिंग्जच्या अर्थतज्ज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेत अशीच सुधारणा होत राहिली, तर जानेवारी-मार्च २०२१ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत जीडीपीमध्ये दोन ते तीन वाढ दिसून येईल; परंतु त्यासाठी कोरोनाचा संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू व्हायला नको. रिझव्र्ह बँक आणि विविध रेटिंग एजन्सी आणि संशोधन संस्थांनी २०२०-२१ आर्थिक वर्षात देशाची जीडीपी वाढ -१५ ते -४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. इंडस्ट्रियल प्रॉडक्शन इंडेक्स जो एप्रिल २०२० मध्ये -५७.३ टक्क्यांवर गेला होता तो ऑगस्टपर्यंत -टक्क्यांवर आला आहे. मॅन्युफॅक्चरिंग पर्चेqसग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) देखील सप्टेंबरमध्ये ५६.८ टक्के सेवा क्षेत्राचा पीएमआयही ४९.८ टक्क्यांवर गेला आहे. सप्टेंबरमध्ये विजेचा वापर ११३.५४ अब्ज युनिट होता. पूर्वीच्या तुलनेत वीजवापर ५.६ टक्क्यांनी जास्त आहे.
जीएसटी संकलन एप्रिलच्या ३२ हजार १७२ कोटी रुपयांवरून वाढून सप्टेंबरमध्ये ९५ हजार ४८० कोटी रुपयांवर गेला. सप्टेंबर २०१९ पेक्षा तो चार टक्के जास्त आहे. क्रिसिल इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी. के. जोशी यांच्या मते जानेवारी – मार्च २०२१ च्या तिमाहीत जीडीपीमध्ये २ टक्के वाढ होऊ शकते; परंतु आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील सरासरी वाढ – ९ % राहील. केअर रेटिंग्जचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांच्या मते शेवटच्या तिमाहीत २.५ ते ३ टक्के वाढ होऊ शकते. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सरासरी वाढ -८.२ टक्के राहू शकते. अर्थतज्ज्ञ प्रा. अरुण कुमार यांच्या मते सेवा क्षेत्राचा वाटा ५५ टक्के आहे. सध्या पर्यटनसह अनेक क्षेत्र उघडलेली नाहीत. देशाच्या रोजगारात असंघटित क्षेत्राचा वाटा ९४ टक्के आहे, ज्याची गणना सरकार करत नाही. कृषी क्षेत्रात फुले, कुक्कुटपालन, डेअरी उत्पादनांना फटका बसला असून त्याचे योग्य मूल्यांकन झालेले नाही. कोरोनाचा संसर्ग पुन्हा पसरू नये यासाठी नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या महिन्यात सावध राहिले पाहिजे.