मराठी

दुचाकीला अपघात, महाविद्यालयीन विद्यार्थांचा मृत्यू

राजुरा बाजार ते वरुड रस्त्यावरील गणेशवाडी नजीकची घटना

वरुड/दि.२७ – महाविद्यालयातून येत असतांना गाडी स्लिप होवुन झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू तर एक गंभिर जखमी झाल्याची घटना वरुड ते राजुरा बाजार मार्गावर घडली.
याबाबत प्राप्त माहीतीनुसार, तालुक्यातील बहादा येथील कृणाल सुधाकरराव भुजाडे (१९) व मुरली राऊत (१९) हे दोन्ही मित्र नागपुरच्या नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात बी.कॉम.प्रथम वर्षामध्ये शिकत होता. आज सकाळच्या सुमारास दोघेही एम.एच.२७ एजी २९११ क्रमांकाच्या दुचाकीने थडीपवनी येथे महाविद्यालयात गेले होते. दुपारी २ वाजताच्या दरम्यान परत येत असतांना राजुरा बाजार ते वरुड मार्गावरील गणेशवाडी नजीक त्यांची दुचाकी स्लिप झाली. या अपघातात दुचाकीचा चालक कृणाल हा गंभिररित्या तर मुरली हा किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहीती मिळताच रस्त्याने ये-जा करणा:या नागरिकांनी त्यांना तातडीने वरुडच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर कृणालची प्रकृती गंभिर असल्याने डॉक्टरांनी त्याला नागपुरला नेण्याचा सल्ला दिला. बहादा येथील मंगेश धुर्वे व अक्षय गोहाड हे दोघे कृणालला रुग्णवाहिकेने नागपुरला नेत असतांना चांदस-वाठोडा नजीक कृणालने अखेरचा श्वास घेतला.
कृणाला हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता, त्यांच्या अचानक निघून जाण्याने भुजाडे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कृणालच्या मागे आई, वडिल, १ बहिण असा आप्तपरिवार आहे. अत्यंत सुस्वभावी असलेल्या कृणालच्या निधनाने बहादा गावामध्ये शोककळा पसरली आहे.

Related Articles

Back to top button