मराठी

मोदी यांच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे

 सुशीलकुमार शिंदे यांची टीका

सोलापूर/दि.१० – देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे.देशात बेबंदशाहीची स्थिती येईल, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपध्दतीवर केली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी आज पंढरपूरात येऊन ज्येष्ठ नेते सुधाकर पंत परिचारक, भागवताचार्य वा. ना. उत्पात, किर्तनकार रामदास महाराज जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे पंढरपुरात आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. ती सातत्याने ढासळत आहे. सामाजिक शांतता राहिली नाही. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. अशा या परिस्थितीत बेबंदशाही वाढू शकते, अशी भीती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला. देशातील विरोधी पक्ष विस्कटलेला आहे. देशहितासाठी आता सगळया विरोधकांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केला.
देशात हाथरससारखी एक नाही अनेक प्रकरणे घडली आहेत. येथे सामाजिक विचार खाली गेला आहे. गरीब माणसाला येथे जगणे कठिण झाले आहे. आर्थिक परिस्थिती बिघडली आहे, त्यामुळे नव्या सुशिक्षित तरुणांना काही वाव राहिलेला नाही. त्यामुळे देशातील विस्कटलेल्या सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सोशल मीडियातून काही बनावट अकाऊंट तयार करुन मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा मलाही फटका बसला आहे, असेही ते म्हणाले.

Related Articles

Back to top button