बेरोजगारीचा दर उच्चांकी
नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील कोट्यवधी लोकांनी नोक-या गमावल्या आहेत. भारतदेखील यातून सुटलेला नाही. देशात लाखो लोकांच्या नोक-या गेल्या आहेत. भारतातील बेरोजगारीचा दर पाच आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. ग्रामीण भारतातील परिस्थिती अधिक वाईट आहे. धान लावणीचा हंगाम संपताच बेरोजगारीचा दर आठ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. दोन ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारतातील एकूण बेरोजगारीचा दर ६.६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याच वेळी ग्रामीण भारतात हे प्रमाण ८.३७ टक्के होते. ‘सेंटर ऑफ मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी‘- सीएमआयई‘ च्या आकडेवारीनुसार, एका महिन्यापूर्वी, १२ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचा दर ७.४३ टक्के होता. तो आता ८.६७ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. ग्रामीण भारताबद्दल बोलायचे झाले, तर मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात बेरोजगारीचे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढले आहे. दोन बेरोजगारीचा दर ८.३७ टक्के झाला आहे. ‘सीएमआयई‘च्या आकडेवारीनुसार शहरी भागात बेरोजगारांची संख्या देशातील ग्रामीण भागाच्या तुलनेत वाढली आहे. कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीमध्ये थोडी शिथिलता आल्यानंतर शहरातील बेरोजगारीचा दर खाली आला होता; परंतु पुन्हा एकदा हा ट्रेंड बदलू लागला आहे आणि शहरी बेरोजगारीचा दर वाढला आहे. मागील आठवड्यात ७.३७ टक्क्यांच्या तुलनेत शहरी बेरोजगारीचा दर या आठवड्यात ९.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याच वेळी जुलैमध्ये तो ९.१५ टक्के होता. चौकट टाळेबंदीमुळे बेरोजगारीत वाढ कृषी क्षेत्रात काम नसल्याने व धान लावणीचा हंगाम संपुष्टात आल्याने प्रवासी मजूर शहरांकडे परत येत आहेत; पण उत्पादन व वस्त्रोद्योगाच्या मंद गतीमुळे बेरोजगारीची समस्या आणखी वाढली आहे. मागणी कमी झाल्यामुळे उत्पादन घटले आहे. कोराना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे अनेक राज्यांनी अंशतः टाळेबंदी लावली आहे. या कारणांमुळे या आठवड्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. औपचारिक क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाण १० ते १२ टक्के आहे.