फाईव्ह जीपासून चिनी कंपन्यांना दूर ठेवण्याचा अमेरिकेचा सल्ला
नवी दिल्ली/ दि.२४ – अमेरिकेने भारताला चिनी कंपन्यांना फाईव्ह जी चाचण्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने चीनच्या हुवावे आणि जेटीईला भारतात होणा-या फाईव्ह जी चाचण्या आणि इतर माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (ICT) नेटवर्कमधून काढून टाकण्याची भाषा केली आहे. वास्तविक, अमेरिका आणि भारत या क्षेत्रातील व्यावसायिक सुधारणेच्या योजनेवर काम करत आहेत. पुढील आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर हे भारत दौ-यावर येणार आहेत. ट्रम्प प्रशासनाचे अधिकारी ग्रेग कॅल्बेग म्हणाले, की आम्ही भारत सरकारला भारताच्या ५ जी नेटवर्क आणि विस्तृत आयसीटी पायाभूत सुविधांमधून हुवावे, झेडटीई आणि अन्य अविश्वसनीय कंपन्यांना दूर ठेवावे. या कंपन्यांची उपकरणे काढून टाकण्यास व वगळण्यास भारत सरकारला प्रोत्साहित करू. हे संप्रेषण नेटवर्कच्या जोखमीचे पुनरावलोकन करण्यासदेखील सांगेल, असे त्यांनी म्हटले आहे. एका ऑनलाइन कार्यक्रमात कॅल्बेग म्हणाले, की चिनी कंपन्यांवर विश्वास ठेवता येणार नाही. कारण ते त्यांच्या सरकारच्या इशा-यावर काम करतात. भारतीय दूरसंचार विभागाचे उपमहासंचालक, सीओएआय अधिकारी व अन्य अधिकारीही या कार्यक्रमास उपस्थित होते. तथापि, सीमा विवादांमुळे चिनी कंपन्यांना ५ जी चाचणीपासून दूर ठेवण्याची भारताने आधीच योजना आखली होती. या आठवड्यात भारतीय कंपनी रिलायन्स जिओने अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी क्वालकॉमच्या सहकार्याने अमेरिकेत आपल्या ५ जी तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली. अमेरिकेतील सॅन डिएगो येथे झालेल्या आभासी कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. रिलायन्स जिओचे अध्यक्ष मॅथ्यू ओमान क्वालकॉम इव्हेंटमध्ये म्हणाले, की क्वालकॉम आणि रिलायन्सची सहाय्यक कंपनी रेडिसिस यांच्यासह आम्ही ५ जी तंत्रज्ञानावर काम करत आहोत, जेणेकरून ते लवकरच भारतात सुरू केले जाऊ शकेल.रिलायन्स जिओच्या या यशामुळे अनेक देशांनी बंदी घातलेल्या चिनी कंपनी हुआवेईला मोठे आव्हान मिळू शकते. यात ब्राझील आणि कॅनडासारख्या देशांचा समावेश आहे. तज्ञांच्या मते फाईव्ह जी तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आता रिलायन्स जिओ जगभरात चिनी कंपनी हुआवेची जागा घेईल.
फाईव्ह जीसाठी सव्वा लाख कोटींची गरज
सध्या जगातील ब-याच देशांमध्ये फाईव्ह जी नेटवर्क सुरू झाले आहे. दरम्यान, इंटरनेटची गती तपासणा-या ओपन सिग्नल या कंपनीने अलीकडेच फाईव्ह जी नेटवर्कशी संबंधित अहवाल सादर केला. त्यानुसार, जगात फाईव्ह जीचा वेग सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक आहे, तर दक्षिण कोरिया दुस-या क्रमांकावर आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्र्हिसेसच्या अहवालानुसार ए सर्कल आणि मेट्रो शहरांसाठी, ७८ हजार आठशे कोटी ते एक लाख तीस हजार कोटी रुपये खर्च होऊ शकेल असा अंदाज आहे. मुंबईत फाईव्ह जी नेटवर्कसाठी दहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज आहे.