परदेशातील शिक्षणाचा उपयोग गावासाठी
हिंगोली/दि.१९ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण, थेट स्पेनमधील सँटिआगो विद्यापीठातून ‘भारतातील आदिवासी समाजाचे सत्तेतील स्थान’ या विषयावर पीएच. डी आणि आता हिंगोली जिल्ह्यातील अवघ्या 1,600 लोकसंख्या असणार्या डिग्रसवाणी या दुर्गम खेड्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य… हा प्रेरक आणि तितकाच थक्क करणारा प्रवास आहे डॉ. चित्रा अनिल कुर्हे यांचा. परदेशातील शिक्षणाचा उपयोग गावासाठी करण्याचा मनोदय डॉ. कुर्हे यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत पॅनलकडून चित्रा यांनी निवडणूक लढवली आणि त्यांच्या गटाचे नऊपैकी तब्बल आठ सदस्य निवडून आले. परदेशातील शिक्षणाचा उपयोग गावचा कायापालट करण्यासाठी करायचा, महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवायचा हे त्यांचे स्वप्न आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी हे त्यांचे माहेर. आधीपासूनच राजकीय क्षेत्राची आवड असल्याने 2010 मध्ये पुणे विद्यापीठातून राजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणीच्या प्रा. अनिल कुर्हे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पती पीएच. डी स्कॉलर असल्याने त्यांनाही राजशास्त्रात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी स्पेनमध्ये सँटिआगो विद्यापीठातून शिकण्याचा निर्णय घेतला. भारत व स्पेनमध्ये राजकीय साम्य असल्याने दोघेही 2012 मध्ये तेथे पोहोचलो. तेथे ‘भारतातील आदिवासी समाजाचे सत्तेतील स्थान : 1992 ते 2012’ या विषयी प्रबंध सादर करुन पीएच. डी मिळवली. 2016 मध्ये पीएच. डी तसंच युरोपियन युनियनची एक्स्पर्ट फेलोशिप मिळाली. डिग्रसवाणी येथे परतल्यानंतर पाण्यासाठी महिलांची भटकंती, रस्त्यांची दुर्दशा, सांडपाणी व्यवस्थापन, पुरुषांमध्ये व्यसनाधीनता, महिलांच्या आरोग्यसमस्या आदी प्रश्न भेडसावत असल्याचे पाहिले आणि ही बाब मनाला अस्वस्थ करुन गेली. त्यामुळे यापुढे भारतातच, किंबहुना गावातच राहून या प्रश्नावर काम करण्याचा निर्णय घेतला, असे त्या सांगतात. पती प्रा. अनिल यांना प्रवरानगर येथील विखे पाटील महाविद्यालयात नोकरी मिळाली. मी मात्र डिग्रसवाणी गाव आदर्श करण्याचा चंग बांधला; पण यासाठी राजकारणात येण्याशिवाय पर्याय नव्हता. ग्रामपंचायत निवडणूक ही चालून आलेली संधी असल्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन गावात पॅनल उभे केले. गावचा अभ्यास करून जाहीरनामा तयार केला. विरोधी पॅनलवर टीका न करता केवळ विकासावर भर देणार असल्याचे आश्वासन दिले आणि यश मिळाले. सरपंचपद मिळाल्यानंतर आदर्श गाव करण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. या निवडणुकीत वंचितचे प्रदेश पदाधिकारी राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख, पदाधिकारी रवींद्र वाढे यांनी मदत केली, असे डॉ. चित्रा सांगतात.