मराठी

जागतिक एड्सदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करावे

 जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. २६: जागतिक एड्सदिनानिमित्त यंदा ‘मातेपासून बाळाला होणा-या संसर्गाला प्रतिबंध’ अशी थीम राबविण्यात येणार आहे. यानुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतेच येथे दिले.
एड्स नियंत्रण सोसायटी व जिल्हा रूग्णालयाच्या विद्यमाने एड्स नियंत्रण कार्यक्रमाबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जागतिक एड्सदिनानिमित्त जनजागृतीसाठी महाविद्यालयातर्फे सोशल मिडीयाद्वारे व्याख्यानमाला, ऑनलाईन पोस्टर स्पर्धा यासह विविध अभिनव उपक्रम राबवावेत. कोरोना साथीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यानुसार कार्यवाही व्हावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
शासकीय रूग्णालयांत एचआयव्ही तपासणी व उपचार विनामूल्य उपलब्ध आहेत. माहिती गोपनीय ठेवली जाते. हेल्पलाईन 1097  या क्रमांकावर विविध भाषांत उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, मार्गदर्शनासाठी नॅको ॲप प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध आहे. कोविड-19 साथीनुसार जारी सूचनांचे पालन करून उपक्रमात अधिकाधिक युवकांचा सहभाग मिळविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Articles

Back to top button