कृषी विभागामार्फत ‘विकेल ते पिकेल’ अभियानासह विविध योजना
जिल्ह्यात अभियान व योजनांच्या यशस्वितेसाठी परिपूर्ण नियोजन करावे
अमरावती, दि. 10 : शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बाजारपेठेचा कल ओळखून मूल्यसाखळी निर्माण होणे गरजेचे आहे. त्यानुसार शासनाकडून शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल अभियान’ अंमलात आले आहे. त्याच्या यशस्वितेसाठी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘विकेल ते पिकेल’ अभियान, मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्रामकृषी विकास समिती या योजनांचा ऑनलाईन शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यानिमित्त अमरावती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडूनही मुंबईतील कार्यक्रमाचे प्रक्षेपण व त्यानंतर योजनांविषयी माहितीपर कार्यक्रम झाला.
बाजारपेठेचा कल ओळखून मूल्यसाखळी निर्माण करणे, आवश्यक संघटन, त्यानुरूप पिकांचे नियोजन, विक्री व्यवस्थेची सुविधा, आवश्यक मार्गदर्शन याद्वारे शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी विकेल ते पिकेल अभियान उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यात अभियानाच्या यशस्वितेसाठी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री एड. ठाकूर यांनी दिले आहेत.
-
बाजारपेठेची गरज ओळखून विक्री व्यवस्था निर्माण होणे आवश्यक
दरम्यान, जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून योजनांच्या शुभारंभानिमित्त अमरावती येथील कृषी चिकित्सालय शासकीय रोपवाटिकेच्या कार्यालयात प्रगतीशील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी यावेळी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. शेतकरी गटांमार्फत शेतमाल उत्पादन करून ग्राहकांची गरज ओळखून विक्री व्यवस्था स्वत:च निर्माण केल्यास त्यास हमखास भाव मिळू शकतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी संघटित होऊन शेतमालाचे उत्पादन केल्यास निश्चित प्रगती होऊ शकेल. कृषी विभाग शेतकरी बांधवांना अद्ययावत तंत्रज्ञान, मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे श्री. चवाळे यांनी यावेळी सांगितले. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून मुल्य साखळी निर्माण करण्याचे शासनाचे नियोजन आहे. गाव पातळीवर पहिल्यांदाच शेती संदर्भात ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाजीपाला व फळे बाहेरराज्यात निर्यात व्हावेत व निर्यातीत वाढ व्हावी, असा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. भाजीपाला लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रयोगशील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. चवाळे यांनी दिली. कृषी उपसंचालक अनिल खर्चान यांनी यावेळी आभार मानले.