मराठी

न्यायालयाच्या आवारात विखे धरणे धरणार

साई संस्थानच्या कर्मचा-यांचा प्रश्न; न्यायाधीश वेळ देत नसल्याचा आरोप

नगर : शिर्डी येथील साई संस्थानच्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नी अनेकदा पत्र पाठवूनही साई संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष वेळ देत नाहीत. त्यामुळे त्यांची भेट मिळविण्यासाठी हजारो कामगार व ग्रामस्थांना घेऊन ते बसत असलेल्या नगरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात धरणे धरणार असल्याचा इशारा माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

कामगारांच्या बैठकीत विखे यांनी हा इशारा दिला असून यासह न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्चपासून साई मंदिर बंद ठेवण्यात आले असून मंदिरात येणाऱ्या दानाला मोठा फटका बसल्याने अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली. यातील अनेक कर्मचारी कोरोनाच्या संकटात नर्सिंग स्टाफमध्ये कार्यरत असताना त्यांच्याही पगारात कपात करण्यात आली. वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने आज भाजप विखे पाटील यांनी कामगारांची बैठक घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उच्च न्यायालयाने संस्थानचा अंतरिम कारभार पाहण्यासाठी तदर्थ समितीची नियुक्ती केली आहे. समितीचे अध्यक्ष संस्थानचे न्यायाधीश आहेत. त्यांना कामगार व लोकप्रतिनिधींनाही भेटण्यास वेळ नसेल तर त्यांनी पदावरून दूर व्हावे अशी मागणी विखे यांनी करताना समितीच्या मनमानी काराभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी संस्थान कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील. गुरूवारी ग्रामस्थ घंटानाद व महाआरती करतील. यानंतरही समितीच्या धोरणात फरक पडला नाही, तर आपण कामगारांच्या बरोबर लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचेही विखे यांनी जाहीर केले

Back to top button