कोरानावरील लस निर्मितीत रशियाकडून नियमांचे उल्लंघन
जीनिव्हा: कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी लस विकसित केली असल्याचा दावा रशियाने केला. ही लस या महिन्यापासून आरोग्य कर्मचार्यांना उपलब्ध करून देणार असल्याचेही रशियाने म्हटले होते; मात्र जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रशियाने निर्देशांचे पालन केले नसल्याचा ठपका जागतिक आरोग्य संघटनेने ठेवला आहे. त्यामुळे आता रशियन लसीबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. रशियाने पुढील महिन्यांपासून कोरोनावरील लशीचे उत्पादन आणि वितरण सुरू करणार असल्याचे म्हटले होते. त्याशिवाय ऑक्टोबर महिन्यात लसीकरणाची मोहीम हाती घेणार असल्याचे म्हटले होते; मात्र जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या लसीवर शंका उपस्थित केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते क्रिस्टीयन लीडमियर यांनी सांगितले, की कोणत्याही देशाने तिसर्या टप्प्यातील चाचणी न घेताच लसीच्या उत्पादनासाठी परवानगी दिली, तर त्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. लस निर्मितीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने निर्देश, मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. लस विकसित करण्याचा प्रयत्न करत असलेल्यांना या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.