मराठी

ज्येष्ठांचे नियंत्रण सुटल्याने दिल्लीत हिंसक वळण

नवी दिल्ली/दि.२७ – गेल्या दोन महिन्यांपासून शांततेने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी 26 जानेवारीला ट्रॅक्टर परेड काढली. काही ठिकाणी पोलिसांनी विरोध केल्यानंतर आंदोलनातील युवक संतप्त झाले. ज्येष्ठांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु युवक ऐकायला तयार नव्हते. ज्येष्ठांचे नियंत्रण सुटल्याने दिल्लीत हिंसाचार झाला. लाल किल्ल्यावर केसरी झेंडा फडकावण्यात आला. हजारो निदर्शकांनी पदयात्रा काढली. या वेळी स्थानिक लोकही त्यांचे स्वागत करत होते. हिंसाचाराच्या वृत्तानंतर दिल्लीच्या दुसर्‍या भागातून परिस्थिती आणखी बिकट झाली. टिकरीमधून बाहेर पडलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये सामील झालेल्या लोकांना दिल्लीच्या इतर भागात हिंसाचार आणि बॅरिकेड्स तोडल्याची खबर मिळाली. त्यामुळे तणाव आणखी वाढला. नांगलोई उड्डाणपुलाच्या खाली खंदक आहे. शेतकरी दिल्लीच्या दिशेने जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी येथे प्रचंड बॅरिकेडिंग केली होती. आंदोलक तिथे पोचल्यानंतर शेतकरी दोन गटात विभागले गेले. बॅरिकेड्स तोडून दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न करणारा तरुणांचा एक गट होता. इतर शेतकरी हे स्वयंसेवक आणि शेतकरी संघटनांशी संबंधित ज्येष्ठ शेतकरी नेते होते, जे नजफगडच्या दिशेने निश्चित मार्गावर चालण्याचा आग्रह धरीत होते. दोन्ही गटांत वाद सुरू होता आणि पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. दुपारी 12 वाजता या ठिकाणी परेड थांबली. गर्दी वाढली. घोषणाबाजीही वाढली. सुमारे एक वाजण्याच्या सुमारास, संतप्त तरुणांनी नांगलोई येथे पोलिस बंदोबस्त तोडला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रूधुराची नळकांडी फोडल्यानंतर चेंगराचेंगरी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. सुमारे तासभर तणावाची परिस्थिती होती. त्यानंतर पोलिसांना बॅरिकेड सोडून पळून जावे लागले. वाहने तोडण्यात आली होती. ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी निदर्शकांनी अनेक वाहनांचे नुकसान केले.
स्वयंसेवक आणि शेतकरी नेत्यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.पण उत्साही तरुणांनी त्यांचे ऐकले नाही. ज्येष्ठांच्या हातून शेतकर्‍यांच्या जमावाचे नेतृत्व सुटले. गोंधळलेल्या तरुणांनी आंदोलनाचा ताबा घेतला. तीन वाजण्याच्या सुमारास नांगलोई तिराहा येथे उभी असलेली पोलिसांची वाहने तोडण्यात आली. पोलिसांच्या तुटलेल्या वाहनांसह तरुण सेल्फी घेत होते. पोलिसांची वाहने ट्रॅक्टरने तोडली जात होती. या गोंधळाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या बर्‍याच लोकांचे मोबाईल फोडण्यात आले. काही काळापूर्वीपर्यत आजूबाजूच्या भागातील लोक घाबरले. पोलिसांनी आसपासच्या घरांमध्ये आश्रय घेतला. संध्याकाळी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर रस्त्यावर लपलेले पोलिस बाहेर आले आणि त्यांनी पुन्हा परिस्थिती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
लाल किल्ल्यावरील खालसा पंथाचा ध्वज आणि आयटीओवरील जोरदार गदारोळानंतर हळूहळू परिस्थिती ताब्यात घेणासाठी नांगलोईमध्ये एक मोठी फौज आली होती. ज्येष्ठ शेतकरी नेत्यांनी कबुली दिली की, त्यांना युवकांचा राग कळला नाही आणि त्यांना आंदोलन सांभाळता आले नाही.

Related Articles

Back to top button