मराठी

विश्वहिंदू परिषदही आता ठाकरेंविरोधात

कंगना राणावत प्रकरण

अयोध्या/दि. ११ –  शिवसेना(SHIVSENA) विरुद्ध कंगना राणावत(KANGANA RANUAT) प्रकरणात आता विश्व हिंदू परिषदेनेही उडी घेतली. मुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम अवैध ठरवून अभिनेत्री कंगना हिचे घर उद्ध्वस्त केल्यानंतर शिवसेनेवर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM UDDHAV THACKREY) यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. ‘यापुढे उद्धव ठाकरे यांचे अयोध्येत स्वागत होणार नाही, तर तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. हनुमान गढी मंदिराचे पुजारी महंत राजू दास यांनी कंगना हिच्या घर वजा कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाई आणि तोडफोडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे अयोध्येत कोणतेही स्वागत होणार नाही. आता जर इथे आले, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अयोध्येतील संतांच्यां विरोधाचा सामना करावा लागेल’ असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला. वेळ न दवडता महाराष्ट्र सरकारने अभिनेत्रीविरुद्ध कारवाई केली; परंतु हेच सरकार अद्याप पालघरमध्ये झालेल्या दोन साधूंच्या हत्याऱ्यांविरोधात कारवाई करू शकलेले नाही’ असे त्यांनी म्हटले, कंगना राष्ट्रवादी शक्तींचे समर्थन करत आहे तसेच तिने मुंबईतील ड्रग्ज माफियांविरोधात आवाज उचलला, म्हणूनच तिला जाणून-बुजून निशाण्यावर घेतले जात आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक प्रवक्ते शरद शर्मा यांनी म्हटले आहे.
अयोध्येतील संत समाजाचे प्रमुख महंत कन्हैया दास यांनी असामाजिक कारवायांत सहभागी असलेल्यांचा बचाव करण्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना अयोध्येला न येण्याचा इशारा दिला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आत्ता उरलेली नाही’, अशीही टिप्पणी त्यांनी केली.
२४ नोव्हेंबर २०१८ रोजी ठाकरे अयोध्येत आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी १६ जून रोजी आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर या वर्षी मार्च महिन्यात त्यांनी पुन्हा एकदा अयोध्येला भेट दिली होती.

Back to top button