मराठी

पालकमंत्र्यांकडून जिल्हा कारागृहाला भेट व पाहणी

  • बंदिजनांशी साधला संवाद

  • स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिस्तंभाला अभिवादन

अमरावती/दि. 15 – राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन पाहणी केली व बंदीजनांशी संवाद साधून तेथील सुविधांबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कारावास भोगाव्या लागलेल्या महापुरूषांच्या गौरवार्थ कारागृहात उभारण्यात आलेल्या स्तंभाला भेट देऊन अभिवादनही केले.

बंदीजनांसाठी कारागृह व्यवस्थापनाकडून चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोरोना संकटकाळात मास्कनिर्मितीच्या कामात मोठे योगदान मिळाले. आता गणेशमूर्तीसह विविध मूर्ती, फुलदाणी, विविध प्रकारचे फर्निचर बनविण्यात येत आहे. या उपक्रमांसह बंदीजनांचे कौशल्य जाणून त्याचा त्या उत्पादननिर्मितीत उपयोग करून घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कारागृह अधीक्षक रमेश कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांनी बंदीजनांतील कुशल कारागीरांनी निर्माण केलेल्या मूर्ती, फर्निचर आदी वस्तूंची पाहणी करून बंदीजनांना शुभेच्छा दिल्या. बंदीजनांसाठीच्या भोजनगृहालाही त्यांनी तेथील व्यवस्थेची पाहणी केली, तसेच कारागृहातील कम्युनिटी रेडिओ, ग्रंथालय आदींचीही पाहणी केली.

यावेळी पालकमंत्र्यांनी महिला कारागृहालाही भेट देऊन तेथील महिला बंदीजनांच्या अडचणींबाबत जाणून घेतले. काही महिला बंदीजनांच्या मागणीनुसार त्यांना चित्रकलेचे साहित्य उपलब्ध करून त्यांच्या कौशल्यानुसार चांगली चित्रेही तयार करून घेतील ज्यांची कारागृहात तयार होणा-या इतर वस्तूंप्रमाणे विक्री होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

कुशल कारागीर असलेल्या बंदीजनांकडून अनेक उपयुक्त वस्तूंची निर्मिती होते. त्यांच्या विपणनासाठी चांगला कॅटलॉग तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केली.

स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिस्तंभाला अभिवादन

स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणा-या महापुरूषांना कारावास भोगावा लागला. त्यातील अनेकजणांना अमरावती कारागृहात ठेवण्यात आले होते. या ठिकाणाला पालकमंत्र्यांनी भेट दिली. या ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकांच्या गौरवार्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाला पुष्पगुच्छ वाहून पालकमंत्र्यांनी अभिवादन केले.

अनेक महापुरूषांनी या देशासाठी घरादाराची पर्वा न करता कारावास भोगला. अनेकजण हुतात्मे झाले. त्यांच्या योगदानामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांना पालकमंत्र्यांनी वंदन केले.

प्रारंभी श्री. कांबळे यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले.

Related Articles

Back to top button