अमरावती/दि. २४ – कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्ह्यात सर्वदूर राबविण्यात येत असून, सुमारे सात लाख कुटुंबांना आरोग्य पथके प्रत्यक्ष भेट देऊन सर्दी, खोकला, ताप व आक्सिजन लेव्हल आदी तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात तीन लाखांहून अधिक कुटुंबांना भेटी देऊन तपासणी करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामही नियोजनानुसार पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
कोरोना प्रतिबंधासाठी शासन व प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्ह्यात सर्वत्र 15 सप्टेंबरपासून राबविण्यात येत आहे. मोहिमेत प्रत्येक कुटुंबापर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी होत आहे. लोकांना आरोग्य शिक्षण व महत्वाचे आरोग्य संदेश देणे, तसेच संशयित कोरोना रूग्णांचा शोध घेणे व त्यांना उपचारासाठी संदर्भ सेवा पुरविणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनीविकार, लठ्ठपणा व उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे या मोहिमेमुळे शक्य होत आहे.
अमरावती शहरात महापालिकेच्या पथकांकडून आतापर्यंत 93 हजार 517 गृहभेटी देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात विविध विभागांच्या समन्वयाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत ग्रामीण भागात दोन लाख 13 हजार 717 कुटुंबांना भेट देऊन तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.
नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणा-या कर्मचा-यांना संपूर्ण सहकार्य करावे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. आरोग्य पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा, तसेच ऑक्सिजनचा आवश्यक तिथे पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयातील कंट्रोलरूममधून संनियंत्रण होत असून, जिल्हा स्तरावरही कंट्रोलरूम कार्यान्वित करण्यात आली आहे. याबाबत समन्वय व संनियंत्रणासाठी जिल्हास्तरावरही स्थापित समितीने सतत समन्वय ठेवून काटेकोर संनियंत्रण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांकडून यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे,टास्क फोर्समार्फत रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा वापर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना वैद्यकीय शिक्षण संचालनालयातर्फे जारी करण्यात आल्या आहेत. स्टेरॉइडसचा वापर कधी व कसा करावा याबाबतही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याबाबत शासकीय, तसेच खासगी रूग्णालयांत रूग्णांवर औषधोपचार करणा-या डॉक्टरांना सूचित करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
रेमडिसिविर इंजेक्शनबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत घोडाम यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग आरटीपीसीआर चाचणीद्वारे निश्चित झालेल्या, ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या, इन्फेक्शनचे प्रमाण अधिक असलेल्या रूग्णांना हे इंजेक्शन देण्याबाबत मार्गदर्शक सूचना आहेत. अशा उपचारादरम्यान संपूर्ण दहा दिवस इंजेक्शन देण्याचीही गरज पडत नाही. त्यामुळे आवश्यक त्या रुग्णाला ते पाच दिवस देण्याची सूचना आहे. माईल्ड इन्फेक्शन किंवा लक्षणे नसलेल्या रूग्णांना ते देण्याची गरज नाही आदी विविध बाबींचा या सूचनांत अंतर्भाव आहे. लक्षणे नसल्यास व रूग्णाची प्रकृती सुरक्षित असल्यास अनावश्यकरीत्या हे इंजेक्शन देण्याची गरज नाही. त्यामुळे या सूचना जारी करण्यात आल्याची माहिती डॉ. घोडाम यांनी दिली.