काैटुंबिक मालमत्ता विकून वाधवन कर्जफेड करणार
मुंबई/दि.२० – दिवाळखोरी प्रक्रियेतून जात असलेल्या दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) खरेदीसाठी बोली लावलेले कंपनीचे प्रवर्तक कपिल वाधवन यांनी कर्ज परतफेड करण्यासाठी नवीन ऑफर दिली आहे. वाधवन यांनी रिझर्व्ह बँकेच्या वतीने प्रशासक आर. सुब्रमण्यकुमार यांना एक पत्र पाठले आहे. त्यात कौटुंबिक मालमत्ता विकून डीएचएफएलचे कर्ज फेडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या कौटुंबिक मालमत्तेची किंमत जवळपास 43 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा त्यांनी केला. डीएचएफएलवर जवळपास 90 हजार कोटींचे कर्ज आहे.
या ऑफरद्वारे या मालमत्तांचे जास्तीत जास्त मूल्य निश्चित केले जाईल, असे वाधवन यांनी म्हटले आहे. वाधवन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आपल्या कुटुंबाच्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकल्पांचे हक्क आणि मालमत्ता हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. डीएचएफएलच्या कर्जफेडीचे निराकरण योग्य प्रकारे होईल आणि मालमत्तांसाठी जास्तीत जास्त मूल्यदेखील मिळू शकेल, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकल्पांच्या मूल्यांकनात जुहू गल्ली प्रकल्प आणि इराला प्रकल्पदेखील समाविष्ट आहेत. कंपनीच्या संपादनासाठी निविदा देताना वाधवन म्हणाले, की सर्व मालमत्तांसाठी योग्य मूल्य असले पाहिजे. त्यांनी म्हटले आहे, की मालमत्तेचे चुकीचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करू नये.
वाधवन यांनी प्रशासकाला डीएचएफएलच्या ठराव प्रक्रियेत सूचना करण्यास परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की सप्टेंबर 2018 पासून डीएचएफएलने 44 हजार कोटी रुपये दिले आहेत. या प्रकल्पांचे मूल्यांकन 43 हजार 879 कोटी रुपये असल्याचे वाधवन यांनी म्हटले आहे. तेही बाजार मूल्यापेक्षा 15 टक्क्यांपेक्षा कमी आहे. वाधवन यांनी मुंबईच्या तळोजा कारागृहातून पाठवलेल्या नऊ पानांच्या पत्रात म्हटले आहे, की आजही डीएचएफएल संग्रहण सुमारे दहा ते 15 हजार कोटी रुपये आहे आणि ते सावकारांना देण्यास सक्षम आहेत.
चार कंपन्यांनी बोली लावली
शनिवारी डीएचएफएल खरेदीची निविदा प्रक्रिया संपली. यासाठी चार कंपन्यांनी योजना सादर केली आहे. या कंपन्यांमध्ये अदानी ग्रुप, पिरामल एंटरप्रायजेस, अमेरिकेची ऑक्ट्री आणि हाँगकाँगच्या एससी लोवी यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरी संहितेत डीएचएफएलच्या दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज मागविले. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT) च्या मुंबई खंडपीठात सध्या डीएचएफएलची दिवाळखोरी प्रक्रिया सुरू आहे.