जळगाव/दि. ११ – माझे 40 वर्षांचे राजकीय जीवन संपवण्याचा घाट घातला. फडणवीस यांच्या माध्यमातूनच मला त्रास झाला, हे आज जाहीरपणे नाव घेऊन सांगतो आहे, असा थेट हल्ला माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला. मी पुरावे जमा केले आहेत, मी वरिष्ठांना जाब विचारणार, असेही त्यांनी सांगितले.
लेखक सुनील नेवे यांनी लिहिलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू’ या खडसे यांच्या चरित्राचे प्रकाशन मुक्ताईनगरमध्ये झाले. त्या वेळी खडसे बोलत होते. आपल्या राजकीय हाडवैऱ्याचे कारस्थान एका पुस्तकाच्या माध्यमातून सांगणार असल्याचे ते म्हणाले. अन्य पक्षांकडून आमदार-मंत्रिपदाची ऑफर होती; पण मी पक्ष सोडला नाही. काहीतरी अडकले म्हणून नाथाभाऊ पक्ष सोडत नाहीत असे लोक म्हणतात. पण ज्या पक्षाच्या उभारणीसाठी ४० वर्षे घालवली तो पक्ष सोडू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, की फडणवीस हे अंजली दमानियांना भेटण्यासाठी वेळ देत; पण मला भेटण्यासाठी वेळ देत नव्हते. हॅकर मनीष भंगाळेला अटक करा, असे लेखी पत्र देऊनही अटक केली नाही. पक्षासाठी योगदान असताना माझ्यासह चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांचेही तिकीट कापले. यामुळे पक्षाच्या जागा कमी आल्या, सरकार गेले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर आज हयात असते तर चित्र वेगळे असते. जोपर्यंत पक्षाकडून न्याय मिळत नाही, तोपर्यंत श्रेष्ठींकडे भांडत राहीन. आठ दिवसांपासून या पुस्तकाबाबत उत्सुकता आहे; मात्र तुमच्या मनात ज्याविषयी उत्सुकता आहे ते या पुस्तकात नाही. लवकरच ‘नानासाहेब फडणवीसांचे कारभाई कारस्थान’ हे पुस्तक येत आहे. त्यात पुराव्यानिशी सर्व तथ्ये मांडेन, असे खडसे म्हणाले.