मराठी

प्रत्येक शिक्षकाला वेतन आणि पेंशन मिळवून देऊ

दिलीप निंभोरकर यांचे शिक्षकांना जाहिर आश्वासन

अमरावती २९ : काम करण्याचा मोबदला म्हणून नियमित वेतन मिळणे हा प्रत्येक शिक्षकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यांना तो मिळवून देण्यासाठीच शिक्षक भारती अनेक वर्षांपासून लढत आहे. अनुदानित असो किंवा विनाअनुदानित अथवा खासगी प्रत्येक शाळेतील शिक्षकला नियमित संपूर्ण वेतन आणि सेवानिवृत्तीनंतर सन्मानाची पेंशन मिळेल यासाठी माझा आजन्म लढा असेल. वेतन आणि पेंशनचा अधिकार प्रत्येक शिक्षकाला मिळवून देईलच असे जाहिर आश्वासन दिलीप निंभोरकर यांनी शिक्षकांना केले आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार दिलीप निंभोरकर यांच्या प्रचार प्रक्रियेने जोर धरला आहे. अमरावती विभागातील शिक्षकांकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येतो आहे. शिक्षक भारतीसारख्या राज्यातील सर्वात मोठ्या संघटनेचे आमदार कपिल पाटील यांच्यासारखे खंबीर नेतृत्व माझ्या पाठिशी आहे. विनाअनुदानित शिक्षकांना १ नोव्हेंबर २०२० पासून अनुदान देण्याचे गाजर सरकारने दाखविल्यानंतर ते १ एप्रिल २०१९ पासून मिळायला हवे यासाठी आग्रह धरणारे एकमेव आमदार कपिल पाटीलच होते. मी देखील राज्याच्या शिक्षणमंत्र्यांशी या विषयावर बोलून त्यांना १८ महिन्यांचे वेतन शिक्षकांना मिळालेच पाहिजे असा आग्रह धरला होता. परंतू राज्यातील हे सरकार शिक्षकांप्रती संपूर्णपणे असंवेदनशील असल्यामुळे त्यांनी विनाअनुदानित तसेच नैसर्गिक तुकड्यांवरील शिक्षकांच्या या मुळ प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विनाअनुदानित, अल्प अनुदानित शाळांवरील शिक्षक तसेच नैसर्गिक तुकड्यांवरील शिक्षक अद्यापही त्यांच्या वेतनाच्या मुळ हक्कांपासून दूर आहेत. सरकारने त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे शिक्षकांनी शासनाच्या आमिषाला बळी न पडता शिक्षक भारतीला मतदान करावे असे आवाहन निंभोरकर यांनी केले आहे.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेंशन मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आमदार कपिल पाटील हे विधीमंडळात लढा देत आहेत. त्यांनी कित्येकदा सभागृहात या विषयावरून सरकारला घेरले आहे. त्यावेळी विभागातील आमदार मात्र मूग गिळून बसले होते. २००५ नंतऱच्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी यासाठी शिक्षक भारती नेहमीच आग्रही राहिली आहे. परंतू निष्ठूर केंद्र आणि राज्य सरकार मात्र आपल्या धोरणात बदल करायला तयार नसल्याने शिक्षकांना पेंशनचा अधिकार मिळत नाहिये. मात्र शिक्षक भारती त्यासाठी नेटाने लढा देईल असेही निंभोकर यांनी यावेळी सांगितले.

मे महिन्यात करू विनाअनुदानित शिक्षकांची दिवाळी

  • ऐन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या तोंडावरच राज्यातील आघाडी सरकारने विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानाचे गाजर दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. विनाअनुदानित शिक्षकांची यंदाची दिवाळी अंधारात जाण्याचे कारण येथील सरकारचे धोरण आहे. परंतू पुढील सहा महिन्यातच शिक्षकांना संपूर्ण अनुदान देण्याचा संकल्प करून शिक्षक भारती मैदानात उतरली असून मी आमदार म्हणून निवडून आल्यास शिक्षकांची दिवाळी मे महिन्यातच साजरी होईल असे निंभोरकर यांनी शिक्षकांना संबोधित करताना सांगितले
  • ‘विनाअनुदानित’ ही संकल्पनाच बंद करू

राज्यात विनाअनुदानित तत्वावर शाळांना परवानगी देण्याची पद्धती बंद करून प्रत्येकाला मोफत शिक्षण ही शासनाची जबाबदारी म्हणून शाळांना संपूर्ण अनुदान देण्याची पद्धती अमलात आणली जावी यासाठी शिक्षक भारती लढा देणार आहे. अनुदानाची संकल्पना कालबाह्य करून शिक्षकांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून शासनाने वेतन द्यावे असे नवे धोरण अमलात आणले जाईल यासाठी मी लढा देणार आहे असे निंभोरकर शिक्षकांशी संवाद साधताना म्हणाले.

Related Articles

Back to top button