‘आम्ही सारे’ फाउंडेशनसोबत वेबसंवाद
गाडगेबाबा , तुकडोजी महाराजांच्या विचारांची शिदोरी हा आयुष्याचा बहुमोल ठेवा -सत्यपाल महाराज
अमरावती – दि. १६ ( प्रतिनिधी ) – संत गाडगेबाबा हाच माझा देव . त्यांचे आयुष्य वाचत गेलो , समजत गेलो आणि त्यानुसार वागण्याचा गेले ५० वर्ष प्रयत्न करत आहे . गाडगेबाबा , तुकडोजी महाराजांनी दिलेली विचारांची शिदोरी हाच माझ्या आयुष्याचा बहुमोल ठेवा आहे , असे प्रतिपादन गाडगेबाबांचा वारसा चालविणारे नामवंत कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी आज केले .
‘आम्ही सारे’ फाउंडेशन व ‘मीडिया वॉच’ पब्लिकेशनतर्फे आयोजित वेबसंवादात ते बोलत होते . ही मुलाखत ‘मीडिया वॉच’ चे कार्यकारी संपादक संतोष अरसोड यांनी घेतली . ‘अठरापगड जातीतील एका जातीत माझा जन्म झाला . शिक्षणही फार घेऊ शकलो नाही . मात्र शाळकरी वयात गाडगेबाबांचे विचार ऐकायला मिळाले आणि आयुष्याला दिशा मिळाली . त्यानंतर बाबांच्याच शिकवणीनुसार कुठलाही बडेजाव न करता , मोठेपणा न मिरवता बाबांचे विचार सामान्य माणसांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला’, असे सत्यपाल महाराज म्हणाले .
शाळा – महाविद्यालयातील शिक्षणापेक्षा आपल्या सभोवतालची माणसं , परिस्थिती तुम्हाला खूप काही शिकवून जाते . माझ्याबाबतही तेच झाले .सभोवतालची गरिबी , अंधश्रद्धा , व्यसनाधीनता , हुंड्यासाठी मुलींना होणारा त्रास अशा अनेक समस्या आजूबाजूला दिसत होत्या . त्या विषयात जनजागरण करण्यासाठी गाडगेबाबांच्या कीर्तनाचा मार्ग निवडला . कीर्तन कसं करतात वगैरे मला माहित नव्हते . पण गाडगेबाबा डोक्यात होते . त्यांच्या पद्धतीने ग्रामीण जनतेशी त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत गेलो . लोकांना ते आवडत गेलं. मी जे काही केलं त्यात कौतुकाचा काही विषय नाही . ‘बुडते ते जन न देखवे डोळा’ अशी माझी स्थिती होती . त्यामुळे कळकळीने तेवढं बोलत गेलो . लोक जमत गेले . आज मी जो काही आहे, तो गाडगेबाबा , तुकडोजी महाराजांमुळे आहे . मी केवळ त्यांच्या विचारांचा भारवाही तेवढा आहे .
‘कीर्तनाचे कार्यक्रम सुरु केल्यानंतर आयुष्यात लबाडी कधी करायची नाही आणि कीर्तनाला पोट भरण्याचा व्यवसाय कधी होऊ द्यायचा नाही , हे मी ठरविले होते . त्यामुळेच माझा व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा कष्ट , मेहनत करून करायचा हे मी फार आधीच ठरविले होते . त्यामुळे अकोटच्या आठवडी बाजारात बनियन विकण्याची मला कधी लाज वाटली नाही,’ असे महाराज म्हणाले . समाज बदलत आहे . शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे , नवीन तंत्रज्ञानाने आयुष्य बदलत आहे . पण समाजाची विचार करण्याची पद्धत बदलविण्यासाठी अजून खूप काही करण्याची गरज आहे, ‘असे त्यांनी सांगितले .
‘कीर्तनाच्या ४५-५० वर्षाच्या प्रवासाने मला खूप काही दिलं. थोरामोठ्यांचा सहवास लाभला . अनेक पुरस्कार –सन्मान मिळाले . मात्र आपल्याला समाजाकडून मिळालं त्याची परतफेड केली पाहिजे ही माझी भावना आहे .सुदैवाने माझं कुटुंबही यात मला साथ देते आहे . वृद्धांसाठी सर्व सुविधायुक्त वृद्धाश्रम उभारण्याचं काम हाती घेतलं आहे . ते लवकर पूर्णत्वास जावे , एवढी इच्छा आहे ‘, असे त्यांनी यावेळी सांगितले . मुलाखतीत सत्यपाल महाराजांनी बालवयातील आपल्या गावातील शिरसोली येथील आठवणी सांगितल्या . सुरुवातीच्या काळात मोटार सायकलने प्रवास करून केलेले कीर्तन, साधेपणाने केलेलं लग्न अशा अनेक आठवणींचा पदर यावेळी त्यांनी उलगडला. ‘आपल्यावर आपल्या आईचा खूप प्रभाव आहे . तिने माझ्या डोक्यात कधीही हवा जावू दिली नाही,’ हे त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले .
या वेबसंवादात ‘आम्ही सारे’ फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश दुधे , सचिव डॉ. गजानन नारे , अरुणाताई सबाने , आशुतोष शेवाळकर, नितीन पखाले, आनंद कसंबे, प्रा . प्रसेनजीत तेलंग , सुनील यावलीकर, प्रा . हेमंत खडके, हर्षल-प्रीती रेवणे, अतुल विडूळकर, श्रीकांत चौधरी, विकास अडलोक, प्रा. गोविंद तिरमनवार, बाबा चौधरी आदी अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते . यू ट्यूब व फेसबुकच्या माध्यमातून महाराजांच्या हजारो चाहत्यांनी या मुलाखतीचा आनंद घेतला . या वेबसंवादात इंग्लंड , शारजाह , जपान ,युक्रेन येथील महाराजांचे चाहतेही सहभागी झाले होते .