मराठी

विलगीकरण केंद्रातील महिला सुरक्षेसाठीच्या SOP कधी जाहीर करणार

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा सवाल

मुंबई/दि. ५ – विलगीकरण केंद्रातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मंत्रालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत झालेल्या वाढीची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले. असेच निवेदन गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही देण्यात आले.
श्रीमती चित्रा वाघ म्हणाल्या की, कोरोना संकटकाळात  सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मार्च महिन्यापासुन राज्यातल्या विविध ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. विलगीकरण केंद्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी SOP जाहीर करण्याची घोषणा या  सरकारच्याच ‘दिशा कायद्या’ च्या घोषणेसारखीच कागदोपत्री राहिली आहे.
विलगीकरण केंद्रामध्ये पुरूष आणि महिला रूग्णांना वेगवेगळे ठेवण्यात यावे, केंद्रातल्या रूग्णांची माहिती केंद्र प्रमुखांनी स्थानिक प्रशासनाला द्यावी, महिला विलगीकरण केंद्राला पोलिस सुरक्षा द्यावी , पोलिसांना पीपीई किट द्यावेत तसेच जर या केंद्रामध्ये अत्याचाराची घटना घडली तर आरोपीसह तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसही जबाबदार ठरवावे आदी मागण्या श्रीमती वाघ यांनी यावेळी निवेदनात  केल्या आहेत.

Related Articles

Back to top button