मराठी

जिथे जिथे भाजप सरकार तिथे तिथे दलित, महिला व अल्पसंख्यांकावर अत्याचार

भाजप शासीत राज्यातील महिला, दलितांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात चैत्यभूमीवर काँग्रेसचे आंदोलन

  • भाजपला देशात मनुवाद आणायचा आहेः एकनाथ गायकवाड

मुंबई, दि. ४ – जिथे जिथे भाजप सरकार तिथे तिथे दलित महिला व अल्पसंख्यांकावर अत्याचार ही देशातील सद्याची परिस्थिती आहे. भाजप शासित राज्यांमध्ये महिला आणि दलितांवरील अत्याचारात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. राज्या राज्यातील भाजप सरकारे महिला व दलित व अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणा-यांना पाठीशी घालत आहेत हे अत्यंत दुर्देवी आहे. भाजपाशासीत राज्यांमध्ये महिला, दलित व अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
भाजप शासीत राज्यांमधील महिला व दलितांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे आज महिला व दलित अधिकार दिवस पाळण्यात आला. चैत्यभूमी दादर येथे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले.  यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष व महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल, बी. एम. संदीप, माजी खा. हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर,  आ. भाई जगताप आ. संजय जगताप, आ. हिरामण खोसकर, माजी आ. मधु चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी, प्रकाश सोनावणे, राजन भोसले, प्रवक्ते चरणसिंग सप्रा,  अतुल लोंढे, सचिव राजाराम देशमुख जिशान अहमद, मेहुल वोरा यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात सत्तेवर आल्यापासून देशातील वातावरण गढूळ झाले असून महिला आणि दलितांवरील अत्याचारात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संघाच्या इशा-यावर चालणा-या केंद्रातील व विविध राज्यातील भाजप सरकारे महिला, दलित आणि अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणा-यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे भाजप शासीत राज्यांमध्ये महिला दलित व अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने केला मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरु केल्यामुळे उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला प्रकरण दडपता आले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावर चालणा-या भाजपला पुन्हा वर्णव्यवस्था आणायची आहे पण काँग्रेस पक्ष ते होऊ देणार नाही. या देशातील दलित, वंचित यांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष धर्मांध भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढत राहील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
यावेळी बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड म्हणाले की, महिला व दलितांवर अत्याचार करणाऱ्या जातीयवादी शक्तींना व त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजप सरकारला मूठमाती देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. जे जे अन्याय करतील त्यांना आपण ठामपणे सांगितले पाहिजे की या देशात तुम्हाला स्थान नाही. तुम्हाला या देशात महिलांवर व दलितांवर अत्याचार करता येणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी अन्यायाविरुद्ध लढण्याची व समानतेची शिकवण दिली. पण भारतातील ज्या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार आहे, त्या राज्यांत महिलांना व मागासवर्गीयांना सन्मान मिळत नाही. भाजपला मनुवाद प्रिय आहे. मागासवर्गीय पुढे गेलेले त्यांना आवडत नाहीत. उत्तरप्रदेश मध्ये हाथरस सारखी घटना होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर काहीही बोलत नाहीत, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. भाजपची मनुवादी विचारसरणी आपल्याला संपवायला हवी. कारण त्यांना मनुवाद प्रिय असेल,तर आम्हाला आमच्या दलितांची व आमच्या आयबहिणींची इज्जत प्यारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधींच्या विचारांना मानणारी काँग्रेस पक्षाची  विचारधारा जात पात मानत नाही.  आमची जात भारतीय व आमचा धर्म संविधान आहे, असे गायकवाड म्हणाले.

Related Articles

Back to top button