मराठी

सुशांतसिह हत्येचे पुरावे भाजप का देत नाही?

आ. रोहित पवार यांचा सवाल; पुरावे दडवायचे आहेत का?

नगर/दि. ७ : अभिनेता सुशांतसिह राजपूत यांची हत्या झाल्याचे भाजप म्हणतो आणि पुरावेही देत नाही. सुशांतसिह प्रकरणात तुम्हीच पुरावे दाबत आहात असे म्हणायचे का, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, असेही म्हणता आणि पुरावेही देत नाही, हा काय प्रकार आहे, असा सवाल त्यांनी केला.

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीच्या निमित्ताने आ. पवार आले होते. या वेळी सुशांतसिह प्रकरणावरून त्यांनी भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, भाजपचा ‘सोशल मीडिया‘ सक्षम आहे. या ‘मीडिया‘वर एखादा ट्रेंड चालवणे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जमते. भाजपचे नेते शब्दांशी खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. आज सुशांतसिह राजपूत प्रकरणात तेच चालू आहे. भाजपकडे जर या प्रकरणातील पुरावे असतील, तर त्यांनी ते महाराष्ट्र सरकार व पोलिसांना द्यावेत. पुरावे नसताना ते गंभीर आणि मोठी वक्तव्ये करत असतील, तर ते राजकारण करीत आहेत, हे सर्वसामान्य नागरिकांनाही कळते, असा टोला त्यांनी लगावला.

मुंबई पोलिस योग्य पद्धतीने पाठपुरावा करीत असताना भाजपने त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे; पण सध्या बिहार निवडणूक जवळ आली आहे. तेथे वेगळा वाद सुरू झाला. या वादात सुशांतसिह एका बाजूला राहून राजकारण चालू होईल. सुशांतसिहच्या प्रकरणाला वेगळे वळण लागू शकते. त्यामुळे सुशांतसिह वर अन्याय होऊ शकतो. भाजपकडे या प्रकरणात सरकारमधील कोणी असल्याची नावे असतील, तर त्यांनी ती सांगावीत व तसे पुरावेही द्यावेत, असे आव्हान आ. पवार यांनी दिले. भाजपला या प्रकरणात राजकारण करून काय मिळणार आहे, असा प्रश्न उपस्थित करताना उगाच ते पोलिसांवर आक्षेप घेतात. गेल्या पाच वर्षापासून ज्या पोलिसांचे भाजपने संरक्षण घेतले, त्याच पोलिसांवर आम्ही विश्वास ठेवला. सरकार बदलले म्हणजे पोलिसांवर आपण आक्षेप घेतलाच पाहिजे, असे नसते. त्यामुळे यात राजकारण न करता सुशांतला न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,‘ असा सल्ला त्यांनी भाजप नेत्यांना दिला.

वस्तुस्थिती समोर येण्यासाठी वेळ द्या

बिहारमधील एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती महाराष्ट्रात येऊन सिनेसृष्टीत नाव कमवतो. अशा परिस्थितीत ती व्यक्ती आत्महत्या करीत असेल, तर त्याची पाश्र्वभूमी काय ? आत्महत्या सोडून इतर काही प्रकार आहे का? हे सर्व लोकांच्या समोर आलेच पाहिजे; पण त्यासाठी मुंबई पोलिस लक्ष देत असतील, तर त्यांना काही वेळ देण्याची गरज आहे. यात राजकारण करून केवळ राजकीय पोळी भाजली जाईल; पण त्यात सुशांतला न्याय मिळण्यात अडचण येऊ शकते. पोलिसांवर आक्षेप घेऊन काय मिळणार आहे, असा प्रश्न आ. पवार यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button