जळगाव/दि. १२ – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(DEVENDRA FADANVIS) यांच्या पत्नी अॅक्सिस बँकेत(AXIS BANK) काम करतात आणि गृहविभागाची सगळी खाती तिकडे वळती करून पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला. त्यांना किंवा इतर नेत्यांना राजीनामा द्यायला सांगितला नाही आणि मला मात्र राजीनामा द्यायला सांगितला, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे(EKNATH KHADSE) यांनी भारतीय जनता पक्षाला आणि फडणवीस यांनाही लक्ष्य केले.
खडसे यांनी नुकतंच त्यांच्या चरित्रावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात फडणवीस यांच्यावर नाव घेऊन आरोप केले होते. त्यानंतर आता खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘माझ्यावर आरोप झाल्यानंर भाजपचे वरिष्ठ नेते माझ्याकडे आले आणि त्यांनी राजीनामा मागितला, मी स्वत:हून राजीनामा दिला नाही’, असे खडसे यांनी म्हटले आहे. खडसे म्हणाले, की पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे नाव सांगितल्यामुळे मी कोऱ्या कागदावर सही केली होती. मी स्वतःहून माझ्या मर्जीने राजीनामा दिला नाही; पण पक्षाने मला तसे सांगायला भाग पाडले. माझ्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात एकाही विरोधकाने माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. आमच्या काळात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. अगदी फडणवीसांवर आरोप झाले; परंतु माझ्यावर आरोप झाले आणि दुसऱ्याच दिवशी मला राजीनामा द्यायला लावला.