लोकप्रियतेसाठी किंवा टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत म्हणाले
उस्मानाबाद/दि.२१- सवंग लोकप्रियतेसाठी किंवा टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत केलं आहे. मुख्यमंत्री सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहे. याचवेळी जे कोण थिल्लर चिल्लर आहेत, मला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही असे म्हणत विरोधीपक्षनेत्यांनाही टोला लगावला आहे.
मी पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेटलो त्यांच्याशी संवादसाधला आहे. जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करणार आहोत. नुकसान मोठं आहे. मी इथे दौरा करतो आहे आणि तिकडे मंत्रालयात मदत कशी आणि कधी करायची त्यासंदर्भात कामही सुरु झाले आहे. पंचनामे जवळपास झाले आहेत. त्यामुळे नुसता विचार नाही पण प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा ते आम्ही पाहतो आहोत. दोन तीन दिवसांत यावर आपणास कळेल. विमा कंपन्यांशी देखील बोलून घेत आहोत. केंद्राकडून जीएसटीची थकबाकी देखील येणे बाकी आहे, तो परतावाही लवकर मिळणे गरजेचे आहे. सवंग लोकप्रियतेसाठी, टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नाही, असेही ते म्हणाले.
अक्कलकोटचा दौरा केला, त्याप्रमाणे मी तुळाजापूरची मी धावती भेट घेतली आहे. नुकसान खुप झालं आहे, प्रत्येक मिनिटाची बातमी मी घेत होतो. जिवीतहानी होऊ देऊ नका, असा दिलासा देण्यासाठी आलो आहोत. दिवाळी-दसरा आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणे फार गरजेचे आहे. कोव्हिड काळात जी मदत पोहचवली आहे, तशी कोणत्याही राज्यात झाली नाही.
आज-उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल. तोपर्यंत पंचनामे 80-90 टक्के पूर्ण झाले आहेत. अंदाज आलेला आहे. लवकरात लवकर पूर्ण ताकदीनिशी तुमचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. मी आकडे सांगायला आलेलो नाही. ते करु तुमच्या सुख-समाधानासाठी करु. धीर सोडू नका, खचून जाऊ नका. पुन्हा आपलं आयुष्य जोमाने सुरु करु यासाठी तुम्हाला दिलासा द्यायला आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला मी इथे आलोय. काळजी करु नका, हे तुमचं सरकार आहे. तुम्हाला पूर्ण ताकदीनिशी मदत केल्याशिवाय राहाणार नाही हे वचन तुम्हाला देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना दिली.