मराठी

तरुण गोगोईंच्या निधनाने लोकप्रिय व निष्ठावान नेतृत्व हरपलेः बाळासाहेब थोरात

मुंबई, दि.२३काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा आसाममध्ये शांतता प्रस्थापित करण्यात सिंहाचा वाटा राहिला आहे. आसामचे तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी राज्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, संयमी, लोकप्रिय व निष्ठावान नेतृत्व हरपले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.   गोगोई हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन दहावीत असतानाच राजकारणाकडे आकर्षित झाले. महाविद्यालयात असताना ते भारत युवक समाजाच्या आसाम विभागाचे सक्रिय कार्यकर्ते होते. १९७१ मध्ये जोरहाट मतदारसंघातून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले आणि पुढे सहावेळा ते खासदार म्हणून निवडून गेले.
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री, आसामचे तीन वेळा मुख्यमंत्री अशी त्यांची यशस्वी कारकिर्द राहिली आहे. ते कुशल प्रशासक होते. त्यांच्या निधनाने आसामची व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून देशाच्य़ा राजकारणात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी गोगोई कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, अशा भावना व्यक्त करुन थोरात यांनी गोगोई यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Back to top button