क्वारंटाईन सेंटरमध्ये योगशास्त्राचे धडे
वलगाव :- आपत्तीच्या काळात आरोग्य व मन:स्वास्थ्य निरामय राहण्यासाठी क्वारंटाईन सेंटर्समध्ये विरंगुळ्यासह मानसिक व्यवस्थापनाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार क्वारंटाईन सेंटर्समध्ये आता योगशास्त्राचे धडेही देण्यात येत आहेत. उपचाराबरोबरच सकारात्मक वातावरण असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने क्वारंटाईन सेंटर्समध्ये
उपचार सुविधांसह मानसिक व्यवस्थापनासाठी विविध बाबी, विरंगुळ्याची संगीत, टीव्ही आदी साधने सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार आरोग्याबरोबरच मन:स्वास्थ्यही चांगले राहावे, यासाठी आता योगाचे धडेही देण्यात येत आहेत.आरोग्य विभागातील कर्मचारी सचिन धामणकर हे स्वत: योग प्रशिक्षकही आहेत. वलगाव क्वारंटाईन कक्षात सेवा बजावताना ते कक्षातील दाखल व्यक्तींना दररोज योग प्रशिक्षणही देत आहेत. सहभागींकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. धामणकर यांनी सांगितले. दक्षतेचे सर्व नियम पाळून हा उपक्रम राबविण्यात येतो, असेही ते म्हणाले