वरुड/दि.२२ – अज्ञात दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी वरुड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्राप्त माहीतीनुसार, तालुक्यातील रवाळा येथील यश राजेश परतेती आणि कृष्णा वासुदेव वरखेडे (२५) हे दोघे उमरी येथील निलेश कुमरे यांच्या मालकीच्या नविन होंडा शाईन काळया रंगाच्या विना क्रमांकाच्या मोटरसायकलने मोर्शी वरुड रवाळा येथे येत असतांना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वरुड शहरातील श्रीराम धर्मकाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत यश परतेती आणि कृष्णा वरखेडे दोघेही गंभिररित्या जखमी झाले. गंभिरावस्थेत वरुड पोलिसांनी दोघांनाही वरुडच्या ग्रामिण रुग्णालयात व तेथून अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकरीता रुग्णवाहिकेने नेत असतांना यश परतेती हा वाटेतच मरण पावला.
या प्रकरणी राजेश जानराव परतेती (३०) रा.रवाळा यांच फिर्यादीवरुन वरुड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुध्द भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.