मराठी

दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

तालुक्यातील जरुड येथील घटना

वरुड दि.११ – भरधाव व अनियंत्रीत दुचाकीला कुत्रा आडवा गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक युवकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या जरुड येथील रामदेवबाबा फर्निचर समोर रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृतक दुचाकी चालकाविरुध्द वरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहीतीनुसार, शहापूर (पुनवर्सन) येथील सागर अनिल चंदेल हा २५ वर्षीय युवक वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील इसाफ स्मॉल फायनान्स कंपनीमध्ये नोकरीला होता. घटनेच्या दिवशी रात्री ८.३० च्या सुमारास सागर याने त्याचा भाऊ अंकीत यांस फोन करुन मी कारंजा लाड येथून मोर्शीला पोहचत आहे, तु मला दुचाकीने घ्यायला ये असे सांगितले. सागरच्या सुचनेवरुन अंकीत याने त्याच्याच मालकीची एम.एच.२७ सीपी ६३११ क्रमांकाची मोटरसायकल व गावातीलच प्रतिक रुपेश सहारे नामक मित्राला घेवुन रात्री ९.३० च्या सुमारास मोर्शी येथे गेला. रात्री १० च्या सुमारास तिघेही दुचाकीने शहापूर (पुनवर्सन) कडे येण्यास निघाले तेव्हा सागर हा मोटरसायकल चालवित होता. जरुडमधून शहापूरकडे येत असतांना रामदेवबाबा फर्निचर समोर अचानक कुत्रा आडवा आणि ब्रेक मारताच तिघेही रस्त्यावर जावुन आदळले. या अपघातामध्ये सागर याला रस्त्याचा जोरदार डोक्याला मार लागल्यामुळे तो घटनास्थळावरच मृत्यूमुखी पडला तर अंकीत आणि प्रतिक हे दोघे सुध्दा गंभिर जखमी झाले. गंभिरावस्थेत तिघांनाही वरुडच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी सागरला मृत घोषीत केले तर अंकीत आणि प्रतिक यांचे प्राथमिक उपचार करण्यात आले. याप्रकरणी वरुड पोलिसांनी अंकीत अनिलराव चंदेल (२३) रा.शहापूर (पुनवर्सन) यांचे फिर्यादीवरुन एम.एच.२७ सीपी ६३११ क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुध्द भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली हेकॉ सुनिल आकोलकर, अशोक संभे, मनोज कळसकर, प्रशांत पोकळे सुरु आहे.

Related Articles

Back to top button