मुंबई/दि. २६ – कोरोना विषाणूचा संसर्ग आणि टाळेबंदीमुळे गेल्या पाच महिन्यांत कोट्यवधी लोकांच्या नोक-या गेल्या आहेत. मॅककिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, २०३० पर्यंत आणखी नऊ कोटी लोक शेतीशिवाय अन्य रोजगारांच्या शोधात असतील. मॅकिन्सेच्या अहवालानुसार या लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी भारताचा विकास दर आठ ते साडेआठ टक्क्यांच्या दरम्यान असायला हवा. या आकडेवारीत साडेपाच कोटी महिलांचा समावेश नाही, ज्यांना नोकरीची पुन्हा गरज आहे.
मॅकिन्सेच्या अहवालात ‘इंडियन्स टर्निंग पॉइंट‘ वाढ आणि नोकरीला उत्तेजन देणारा आर्थिक अजेंडा चा उल्लेख केला असून भारताला मोठ्या आर्थिक सुधारणांची आवश्यकता आहे, यावर भर देण्यात आला आहे. सुधारणा केल्या नाहीत, तर अर्थव्यवस्था अनेक दशके दुर्बल राहील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. मॅकिन्सेच्या अंदाजानुसार, सहा कोटी नवीन कामगार रोजगार बाजारात प्रवेश करतील. याशिवाय तीन कोटी कामगार शेतीच्या कामातून मुक्त होऊ इच्छिताता आणि इतर क्षेत्रात रोजगार शोधू शकतात.
या अहवालानुसार, बिगर कृषी क्षेत्रात दरवर्षी १.२० कोटी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भारत हे लक्ष्य कसे गाठू शकतो, हेही मॅकिन्सेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार आर्थिक विकासाला चालना मिळू शकेल, अशा तीन गोष्टी नमूद केल्या आहेत. उत्पादन, शेती निर्यात आणि डिजिटल सेवेवर लक्ष केंद्रित करून सरकार रोजगार वाढवू शकते.