दोन महिन्यात पेट्रोल शंभर रुपयांवर

मुंबई/दि. ८ – दोन वर्षांच्या विक्रमी दराने विकत असलेले पेट्रोल-डिझेल आणखी महाग होऊ शकते. तज्ञांच्या मते, केंद्र किंवा राज्य सरकारांनी पेट्रोल-डिझेलवर कर कमी केले नाहीत, तर पुढील दोन महिन्यांत पेट्रोलचे दर १०० रुपये लिटरवर जातील. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या (क्रूड) दरात झालेली वाढ हे त्याचे कारण आहे. ऑक्टोबरमध्ये क्रूडचा सरासरी दर ३५.७९ डॉलर प्रतिपिंप होता, तो नोव्हेंबरमध्ये वाढून ४५.३४ डॉलर प्रतिपिंप झाला. म्हणजे एक महिन्यात क्रूडच्या दरात २६.६८ टक्के वाढ झाली.
केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले, की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेल क्रूडचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे अमेरिका कच्च्या तेलाचा आयातदार होण्याऐवजी निर्यातदार झाला. आता नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी हे प्रोत्साहन देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमेरिका पुन्हा आयातदार होईल. कोरोना लस तयार झाल्यानंतर आर्थिक घडामोडी वाढतील. त्यामुळे क्रूडच्या मागणीत वाढ होऊन दरही वाढतील. पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा मुद्दा चर्चेत आहे. तसे झाल्यास आणि पेट्रोलला सर्वाधिक कर स्लॅबमध्येही (२८ टक्के ) टाकले तरीही एक लिटर पेट्रोलचा दर जवळपास ३७ रुपये असेल
केंद्र सरकारने या वर्षी दोनदा पेट्रोलवर १७ रुपये लिटर आणि डिझेलवर १६ रुपये लिटर सीमाशुल्क वाढवले आहे. या करावरही राज्य सरकारे व्हॅट वसूल करतात. त्यामुळे दर वीस रुपयांनी वाढले आहेत.

Back to top button